सोलापूरमध्ये सामूहिक प्रयत्नांतून होम मैदानाची स्वच्छता
सोलापूर, 12 मार्च (हिं.स.)सेवा विभाग पर्यावरण गतिविधीच्या पुढाकाराने सोलापूरकरांच्या सामूहिक प्रयत्नांतून झालेल्या स्वच्छता मोहिमेतून होम मैदान स्वच्छ झाले. सुमारे ३०० सोलापूरकरांनी एकत्र येऊन ही स्वच्छता मोहीम राबवली. उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर या
Bv


सोलापूर, 12 मार्च (हिं.स.)सेवा विभाग पर्यावरण गतिविधीच्या पुढाकाराने सोलापूरकरांच्या सामूहिक प्रयत्नांतून झालेल्या स्वच्छता मोहिमेतून होम मैदान स्वच्छ झाले. सुमारे ३०० सोलापूरकरांनी एकत्र येऊन ही स्वच्छता मोहीम राबवली. उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी स्वतः हाती खराटा घेत मैदानाच्या स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला.

सेवा विभाग, पर्यावरण गतिविधी, संत निरंकारी मंडळ, एसव्हीसीएस शाळा, आर्किटेक्चर कॉलेजमधील कार्यकर्ते, विद्यार्थी तसेच महापालिकेचे कर्मचारी आज सकाळी स्वच्छतेचा निश्चय करून होम मैदान येथे जमले. प्रारंभी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, संत निरंकारी मंडळाचे प्रमुख इंद्रपालसिंग नागपाल, नगरसेवक विनोद भोसले, नागेश खरात, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, महापालिकेचे मुख्य सफाई अधिक्षक नागनाथ बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

होम मैदानावर वर्षभर विविध उपक्रम होतात. त्याकरिता सोलापूर महानगरपालिकेकडून होम मैदान आयोजकांना भाड्याने देण्यात येते. मैदानाची योग्य निगा न राखल्यामुळे होम मैदानावर चालणाऱ्या विविध उपक्रमामुळे मैदानाची दुरवस्था होत आहे. परिणामी मैदान अत्यंत अस्वच्छ झाले होते. मैदानावर सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते. यावर उपाय म्हणून सेवा विभाग, पर्यावरण गतिविधी यांनी पुढाकार घेत शहरातील विविध संस्था संघटना मंडळांना सहभागी करून घेत सोलापूर महानगरपालिकेच्या सहभागातून होम मैदानाची स्वच्छता केली.

यावेळी विविध संस्था मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हातात खराटा, टोपली, पोती घेऊन होम मैदानवरील सुमारे पावणेदोन टन कचरा उचलला. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे ८३ कर्मचारी, ७ घंटा गाड्या, जेसीबी, पाण्याची गाडी आदी व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे सफाई अधीक्षक अनिल चराटे, मुख्य आरोग्य निरीक्षक सोमाजी साबळे आदी उपस्थित होते.

या स्वच्छता मोहिमेत पर्यावरण संरक्षण गतिविधि, सोलापूर महानगरपालिका, यश डेव्हलपर्स, इको नेचर क्लब, एस व्ही सी एस स्कूल, संत निरंकारी मंडळ, सेवा विभाग, सोलापूर आर्किटेक्चर असोसिएशन या संस्था मंडळांनी सहभाग घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande