
नाशिक, 13 मार्च (हिं.स.)।
- सोलापूरहून नाशिककडे येत असलेल्या नाशिक डेपोच्या 'हिरकणी' बसला शिंदे टोल नाका परिसरात अचानक भीषण आग लागल्याची घटना आज शुक्रवारी सायंकाळी घडली.
बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी करून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून बसमधील १७ प्रवासी थोडक्यात बचावले. याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक डेपोची हिरकणी बस (एमएच ०६ बीडब्ल्यू १२३५) सोलापूरहून नाशिकच्या दिशेने येत होती. सायंकाळी सुमारे ५:३८ वाजण्याच्या सुमारास बसने शिंदे टोल नाका ओलांडला. टोल नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या 'मोरया' हॉटेलसमोर बसच्या पुढील भागातून अचानक धूर निघू लागल्याचे चालक विलास रखोचोले व वाहक संदीप मोरे यांच्या लक्षात आले.
प्रसंगावधान राखत चालकाने बस तातडीने रस्त्याच्या कडेला उभी केली आणि प्रवाशांना खाली उतरवले. काही क्षणातच बसने पेट घेत आगीने रौद्र रूप धारण केले. पाहता पाहता संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
दरम्यान, टोल नाका कर्मचारी भिकचंद पोरजे यांनी तातडीने अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. नाशिक रोड आणि सिन्नर एमआयडीसी अग्निशमन केंद्राचे प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाले. सुमारे तासभर प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
आग विझवण्यासाठी नाशिक रोड अग्निशमन दलाचे प्रभारी केंद्रप्रमुख राजेंद्र सोनवणे, रामदास काळे, लक्ष्मीकांत बेंद्रे, यश बिडवे, हरिओम खालकर व जाचक यांनी अथक परिश्रम घेतले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत मदत कार्यात सहभाग घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV