सीपीआर रुग्णालयाची व्यवस्था खासगी हॉस्पिटललाही लाजवेल – हसन मुश्रीफ
कोल्हापूर, 13 मार्च (हिं.स.) : आगामी वर्षात कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) येथे अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार असून ही व्यवस्था शहरातील नामांकित खासगी हॉस्पिटललाही लाजवेल, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय मंत्री
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय


कोल्हापूर, 13 मार्च (हिं.स.) : आगामी वर्षात कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) येथे अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार असून ही व्यवस्था शहरातील नामांकित खासगी हॉस्पिटललाही लाजवेल, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. उपचार आणि पैशाअभावी कोणत्याही रुग्णांची हेळसांड होणार नाही, यासाठी अत्यंत प्रगत उपचार पद्धती येथे अवलंबण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेंडा पार्क येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे गट-ड कर्मचाऱ्यांच्या सरळ सेवा भरती नियुक्ती आदेश वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे, डॉ. गिरीश कांबळे आणि प्रशासकीय अधिकारी मानसिंग जगताप उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले की, वैद्यकीय मंत्री म्हणून गेल्या दोन वर्षांत राज्यात तब्बल 8,352 वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे भरली असून त्यामुळे रुग्णसेवेचा दर्जा सुधारण्यास मदत झाली आहे. भविष्यात राज्याच्या जीडीपीमध्ये कोल्हापूरचा वाटा मोठा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज नियुक्ती दिलेल्या 83 उमेदवारांची निवड पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारावर झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच वर्ग-४ कर्मचाऱ्यांनी व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले की, वर्ग-४ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा हा कार्यक्रम केवळ नोकरीची सुरुवात नसून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणारा महत्त्वाचा टप्पा आहे.

या भरती प्रक्रियेत पारदर्शकपणे काम करणाऱ्या सर्व टीमचे त्यांनी कौतुक केले.

कार्यक्रमात रोहित वरपे, अजिंक्य पाटील, स्नेहल घाडगे, धीरज तायशेटे आणि भरत पाटील या पाच उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते प्रतीकात्मक स्वरूपात नियुक्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश आजगावकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. शिरीष मिरगुंडे यांनी केले.

----------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande