
पालघर, 13 मार्च (हिं.स.)। कामाच्या उचल पैशांच्या वादातून २५ वर्षीय कातकरी आदिवासी मजुराचे अपहरण करून त्याला झाडाला उलटे टांगून जखमांवर तिखट मसाला चोळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पालघर परिसरात संतापाची लाट उसळली असून केळवा सागरी पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी सुभाष शिनवार भोईर (वय २५, रा. नावझे, ता. पालघर) याचा भाऊ मदन हा भिवंडी तालुक्यातील पाये येथील वीटभट्टी मालक नंद देवलीकर याच्याकडे कामाला होता. घरखर्चासाठी मदनने मालकाकडून सुमारे ५० हजार रुपयांची उचल घेतली होती. मात्र तो काही दिवस कामावर न आल्याने संतप्त झालेल्या मालकाने त्याचा शोध घेतला. मदन न सापडल्याने आरोपी नंद देवलीकर आणि त्याचा साथीदार घनश्याम यांनी ११ मार्च रोजी पालघर तालुक्यातील जलसार येथून सुभाषचे जबरदस्तीने अपहरण करून त्याला भिवंडीतील पाये येथील वीटभट्टीवर नेले. तेथे मदनचा पत्ता विचारत सुभाषच्या मानेवर व कमरेवर धारदार इस्त्राने जखमा केल्या. तसेच त्याचे हात-पाय बांधून त्याला आंब्याच्या झाडाला उलटे टांगून जखमांवर तिखट मसाला चोळण्यात आला.
या घटनेनंतर पीडिताच्या कुटुंबीयांनी श्रमजीवी संघटनेच्या मदतीने केळवा सागरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे पोलिसांनी कारवाई करत ४८ तासांत सुभाषची सुटका केली. या प्रकरणी आरोपी नंद देवलीकर व घनश्याम (रा. पाये, भिवंडी) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विजया किशन गोस्वामी करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL