
रायगड, 13 मार्च (हिं.स.)। नेरळ पोलीस ठाणे हद्दीत ममदापुर परिसरातील क्रिस्टलमॅनर इमारतीच्या कार्यालयात धक्काबुक्की करून फिर्यादीला जबरदस्तीने ऑफिसमध्ये डांबून ठेवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास मौजे ममदापुर, ता. कर्जत येथील क्रिस्टलमॅनर या इमारतीच्या कार्यालयात ही घटना घडली. फिर्यादी हे माजगाव (मुंबई) येथील रहिवासी असून ते क्रिस्टलमॅनर या इमारतीशी संबंधित कामानिमित्त त्या कार्यालयात गेले होते.
त्यावेळी त्यांनी कार्यालयात ठेवलेल्या इन्व्हर्टरच्या चाव्या घेण्यासाठी ऑफिसमध्ये प्रवेश केला असता आरोपीने त्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर आरोपीने ऑफिसचे शटर खाली ओढून फिर्यादीला जबरदस्तीने आतमध्ये डांबून ठेवले, अशी तक्रार करण्यात आली आहे.
या घटनेनंतर फिर्यादी यांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १२७(२) व ११५(२) अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंडलिक करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)