
रायगड, 13 मार्च (हिं.स.)।
जिल्हा परिषद सत्तास्थापनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सत्तावाटपावरून शिवसेनेत नाराजी असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. समाजमाध्यमांवर जिल्हा परिषद सत्तास्थापनेचा दिवस “काळा दिवस” म्हणून उल्लेख होत असताना या वादावर खासदार सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “हा काळा दिवस नेमका कोणासाठी आहे हे मला माहिती नाही; मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा सुराज्याचा ‘पांढरा दिवस’ आहे,” असे ठामपणे सांगत तटकरे यांनी विरोधकांना टोला लगावला.
तटकरे म्हणाले की, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची निवडणूकपूर्व युती होती आणि जनतेने या युतीला स्पष्ट बहुमत दिले. त्यामुळे लोकशाही मार्गाने सत्ता स्थापनेचा अधिकार आमच्याकडे होता. महायुतीच्या निर्णयामुळे शिवसेनाही सत्तेत सहभागी झाली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेला “काळा दिवस” म्हणणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
लोकशाही व्यवस्थेत पदाधिकारी आणि प्रशासन ही दोन्ही चाके महत्त्वाची असतात. पदाधिकारी नसतील तर प्रशासन आपापल्या पद्धतीने काम करू लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार जनतेला सत्ताधारी ठरवण्याचा अधिकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेकदा निवडणुकीनंतर व्यापक विचार करून पक्ष एकत्र येतात, असेही तटकरे यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांवरही त्यांनी भाष्य केले. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव–इंदापूर बायपासच्या कामातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली असून परिस्थिती अनुकूल राहिल्यास १ जूनपर्यंत वाहतूक सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच रिलायन्सच्या विस्तारीकरणामुळे स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न, गेल (GAIL) प्रकल्प, सागरी महामार्ग प्रकल्पातील भूसंपादन आणि दादर गावातील पाणीपुरवठा योजनेच्या मुद्द्यांवरही पाठपुरावा सुरू असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्याचा आमचा प्रयत्न सुरूच राहील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)