भाजप आणि काँग्रेसच्या आयडिया ऑफ इंडिया यात मोठा फरक - हर्षवर्धन सपकाळ
Representatives of people in North Maharashtra
Representatives of people in North


त्रंबकेश्वर , 13 मार्च (हिं.स.) - काँग्रेसची विचारधारा संविधानाची विचारधारा आहे. समता, बंधुता, शांती, सर्वांना समान न्याय हक्क, स्त्री पुरुष समानता असा आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर, वारकरी संप्रदायाचा विचार आहे, महापुरूषांच्या विचाराला एक प्रवाह आहे आणि तो काँग्रेसचा विचार आहे. भाजपाची आयडिया ऑफ इंडिया व काँग्रेसची आयडिया ऑफ इंडिया यात मोठा फरक आहे. आपल्याला काँग्रेसच्या आयडिया ऑफ इंडियाचा विचार पुढे घेऊन जायचे आहे. काँग्रेसच्या विचारानेच शिक्षण हक्क कायदा, मनरेगा, माहितीचा अधिकार कायदा, अन्न सुरक्षा कायदा दिला. काँग्रेसचा आत्मा व देशाचा आत्मा एकच आहे, असे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हणाले.

त्र्यंबकेश्वर येथील कार्यशाळेच्या सांगता कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बोलत होते. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, प्रदेश सरचिटणीस ब्रिज किशोर दत्त, नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड, नाशिक उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश कहांडाळ यांच्यासह प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या दोन दिवसीय निवासी कार्यशाळेची सांगता झाली.

समारोपाच्या भाषणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री वसंत पुरके यांनी आपल्या भाषणातून भाजपा सरकारच्या धर्मांध राजकारणावर सडकून टीका केली. भाजपाची फोडा आणि राज्य करा निती असून समाजात जाती धर्मांमध्ये भांडणे लावून भाजपा राजकीय पोळी भाजत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानामुळे आणि काँग्रेस सरकारांनी राबवलेल्या धोरणांमुळे या देशातील गरीब, ओबीसी, दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी समाजाला शिक्षण व अधिकार मिळाले. त्यामुळे ते मुख्य प्रवाहात आले. भाजप सरकार हळूहळू या सर्वांचे हक्क काढून घेत आहे. त्यांच्या कल्याणकारी योजनांवरील निधीची कपात करत आहे. विकासाची स्वप्ने दाखवून भाजप समाजात विभागणी करत आहे. भाजपाच्या दडपाशाहीला व भूलथापांना बळी पडू नका, काँग्रेसचा विचारच देशाला तारू शकतो असे वसंत पुरके म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी कुलकर्णी, शाह आलम शेख, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनीही या शिबिराला मार्गदर्शन केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांची आधारतीर्थ आश्रमाला भेट

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सकाळी आधारतीर्थ आश्रमाला भेट दिली. नाशिकपासून त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जाताना, ब्रह्मा व्हॅली इंजिनीअरिंग कॉलेज जवळ, अंजनेरी-तुपदेवी परिसरात हा आश्रम आहे. हे ठिकाण फक्त एक अनाथाश्रम नाही, तर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना नवीन जीवन देवून त्यांच्या भविष्याला आकार देणारे एक केंद्र आहे. सुमारे ३०० हून अधिक मुले-मुली (वय ३ ते १६ वर्षे) इथे राहतात, शिक्षण घेतात, योगाभ्यास करतात, वेद-धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करतात आणि एकत्र खेळत-हसत-गात जीवन जगतात. आश्रमातील मुला-मुलींनी यावेळी शेतकरी राजाला आत्महत्येपासून परावृत्त करून धीर देणाऱ्या नाटकाचे सादरीकरण केले. ही संस्था खरंच समाजासाठी आधारस्तंभ आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष अभय छाजेड, माजी आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन, संग्राम खोपडे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande