
पालघर, 14 मार्च, (हिं.स.)। पालघर–शिरगाव मार्गावरील अल्याळी गावाजवळ पालघर नगरपरिषदेकडून सुरू करण्यात आलेल्या गटारकामावर नियमबाह्यतेचे आरोप होत असून या कामामुळे सरकारी निधीचा अपव्यय होत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. संबंधित कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची (पीडब्ल्यूडी) परवानगी न घेता काम सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत किंवा रस्त्यालगत कोणतेही बांधकाम करायचे असल्यास विभागाचा ना हरकत दाखला (एनओसी) घेणे बंधनकारक असते. मात्र, या गटारकामासाठी नगरपरिषदेकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या कामाला तत्काळ स्थगिती देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे शाखा अभियंता आशिष संखे यांनी सांगितले.
दरम्यान, सुमारे २५ लाख रुपये खर्चाच्या या कामात नियोजनाचा अभाव असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. रस्त्यापासून आवश्यक अंतर न ठेवता काही ठिकाणी सात ते आठ फूट तर काही ठिकाणी अवघ्या दोन फूट अंतरावर गटार बांधण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भविष्यात रस्त्याच्या कामावेळी हे गटार पुन्हा तोडावे लागण्याची शक्यता असून त्यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याशिवाय, बांधकामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. सिमेंटचे प्रमाण आणि बांधकामाची पद्धत तांत्रिक निकषांनुसार नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संबंधित अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. या प्रकरणामुळे पालघर नगरपरिषदेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL