४७ लाखांच्या निधीतून पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य उजळणार
पालघर, 14 मार्च, (हिं.स.)। पालघर जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित व प्रकाशमान वातावरण मिळावे यासाठी सौरऊर्जेवर आधारित पथदिवे बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विक्रमगड, वाडा आणि जव्हार तालु
४७ लाखांच्या निधीतून पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य उजळणार


पालघर, 14 मार्च, (हिं.स.)। पालघर जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित व प्रकाशमान वातावरण मिळावे यासाठी सौरऊर्जेवर आधारित पथदिवे बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विक्रमगड, वाडा आणि जव्हार तालुक्यातील ११ आश्रमशाळांमध्ये एकूण १०६ सौर पथदिवे बसविण्यात येणार असून यासाठी ४७ लाख ७० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ग्रामीण आणि आदिवासी भागातील आश्रमशाळांमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांना अंधाराचा सामना करावा लागत होता. विशेषतः सायंकाळनंतर वसतिगृहातून वर्गखोल्या किंवा भोजनगृहाकडे जाताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत होता. सौर पथदिव्यांमुळे हा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असून विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था (महाऊर्जा) यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. शाळा परिसर, विद्यार्थ्यांची वसतिगृहे, प्रवेशद्वार, आंतरिक रस्ते तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सहा मीटर उंचीचे सौर पथदिवे बसविण्यात येणार आहेत. या दिव्यांच्या डिझाइन, उत्पादन, स्थापना, चाचणी आणि कार्यान्वयनासह पाच वर्षांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारीही संबंधित संस्थेकडे राहणार आहे.

दरम्यान, सौरऊर्जा ही स्वच्छ व अक्षय ऊर्जा असल्याने पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे. पारंपरिक वीजेवरील ताण कमी होऊन शाळांच्या वीजबिलातही बचत होणार आहे. या उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला नवे बळ मिळून त्यांचे भवितव्य अधिक उज्ज्वल होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande