
पुणे, 14 मार्च, (हिं.स.) : डिजिटल साधनांचा वापर करताना सायबर सुरक्षेबाबत सर्वांनी दक्षता बाळगणे आवश्यक आहे,असे मत सायबर तज्ञ् डॉ.रोहन न्यायाधीश यांनी व्यक्त केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पुनाजच्या इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेन्ट अँड रिसर्च अर्थात आयबीएमआर यांच्यावतीने वाकड येथील शैक्षणिक संकुलात आयोजित सायबर सुरक्षा विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, समाजमाध्यमांचा वापर करताना कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती देऊ नये,तसेच कायम सजग राहून कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असे सांगत मोबाईलचा वापर करताना गरजेपुरत्या ऍप्सचाच वापर करावा आणि सायबर गुन्हा घडल्यास पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा असेही न्यायाधीश यांनी सांगितले.
तर यावेळी बोलताना यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनीही त्यांच्या मनोगतात सांगितले की, देशात सायबर गुन्ह्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत असून लाखो करोडो रुपयांची फसवणूक झाल्याची प्रकरणे सामोरे येत आहेत.
तर पिंपरी चिंचवड सायबर पोलीस विभागातील तपास अधिकाऱ्यांनी सायबर गुन्हे नेमके कसे घडतात याची उदाहरणे सांगत त्यापासून बचाव करण्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना करून सावधगिरी बाळगावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी डिजिटल टास्क फोर्सचे सायबर तज्ञ् अमित कांबळे यांनी एखाद्या क्यू आर कोडद्वारे कशाप्रकारे मोबाईल हॅक होतो याचे प्रात्यक्षिक दाखवत मार्गदर्शन केले.
तर यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सचे संचालक राजेश नागरे यांनी त्यांच्या मनोगतातून सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्यासाठी बँक खात्याबाबत कशा प्रकारे सावधगिरी बाळगावी याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरुषी पाटील व सानिका गायकवाड या विद्यार्थिनींनी केले.तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. संपदा गुपचूप यांनी केले.या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अन्य विद्यापिठांशी संलग्न असलेल्या व्यवस्थापनशास्त्र संस्थांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि प्राध्यापक वर्ग सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर