
रत्नागिरी, 14 मार्च, (हिं. स.) : श्री त्रिमुखी देवी उत्सव मंडळ, कोळंबे (खालचा वठार) यांच्या वतीने आयोजित आणि रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन प्रायोजित ढोल वादन स्पर्धेत नाचणे येथील नादगर्जा ढोल पथकाने प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत एकूण १३ ढोल पथकांनी सहभाग घेऊन पारंपरिक ढोलवादन कलेचे दणदणीत सादरीकरण केले.
स्पर्धेसाठी पहिल्या तीन विजेत्या पथकांना अनुक्रमे ५०००, ३००० आणि २००० रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली. याशिवाय सर्व सहभागी पथकांना मानाचा कप, शिल्ड आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील विजेते संघ असे -
प्रथम : नादगर्जा ढोल पथक, वाडेकरवाडी – नाचणे, द्वितीय : सांब रवळनाथ ढोल पथक, चिंचखरी, तृतीय : शिवगर्जना ढोल पथक, नाचणे
हा कार्यक्रम रोटेरियन हिरकांत साळवी यांच्या संकल्पनेतून रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे प्रायोजित करण्यात आला होता. क्लबच्या वतीने डॉ. संदीप करे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय केले.
कार्यक्रमाला सीताराम सावंत, रोटे. बिपिन गांधी, वामन सावंत, आकांक्षा साळवी, सौ. सायली साळवी तसेच इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे सौ. ऋचा गांधी, सौ. श्रद्धा सावंत हे क्लबचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाला हजारो प्रेक्षकांनी उपस्थित राहून ढोल वादनाचा आनंद घेतला. अनेक नागरिकांनी कलाकारांच्या उत्साहाचे कौतुक करत उत्स्फूर्तपणे रोख बक्षिसांची लयलूट केली.
पारंपरिक ढोलवादन कला जोपासणाऱ्या विविध मंडळांनी आकर्षक वेशभूषा, जोशपूर्ण सादरीकरण आणि लयबद्ध तालांनी वातावरण दणाणून सोडले. या उत्साहपूर्ण कार्यक्रमामुळे परिसरात सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले असून उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी