
तेहरान , 15 मार्च (हिं.स.)।इराणने रविवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या १६व्या दिवशीही इराणने इस्रायलवर हल्ले सुरूच ठेवले.
इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डसने एका निवेदनात म्हटले आहे, “जर हा मुलांचा खुनी गुन्हेगार जिवंत राहिला, तर आम्ही पूर्ण ताकदीने त्याचा पाठलाग करत राहू आणि त्याला ठार मारू.”ही प्रतिक्रिया अशा वेळी आली आहे, जेव्हा सोशल मीडियावर नेतन्याहू यांच्या ठिकाणाबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या पोस्ट्स समोर आल्या आहेत. अनेक वापरकर्त्यांनी त्यांच्या १२ मार्च रोजीच्या पत्रकार परिषदेतल्या व्हिडिओबाबत चिंता व्यक्त केली. या व्हिडिओमध्ये त्यांच्या एका हाताला सहा बोटे असल्यासारखे दिसत असल्याने, तो कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरून एडिट करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
२८ फेब्रुवारी रोजी इराणवर अमेरिका आणि इस्रायलने हवाई हल्ले सुरू केल्यानंतर घेतलेल्या आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत नेतन्याहू यांनी इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांची हत्या करण्याची अप्रत्यक्ष धमकी दिली होती आणि या लष्करी कारवाईचे समर्थन केले होते.
नेतन्याहू म्हणाले, “आम्ही कोणती पावले उचलत आहोत याचा मी सविस्तर उल्लेख करणार नाही. या शासनाला सत्तेतून हटवण्यासाठी आम्ही सर्वात अनुकूल परिस्थिती निर्माण करत आहोत. मात्र, इराणची जनता हे शासन उलथवून टाकेल याची मी पूर्ण खात्री देऊ शकत नाही, कारण कोणतेही शासन आतूनच उलथवले जाते.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode