
लातूर, १७ मार्च (हिं.स.) । लातूर जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्री व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) १६ व १७ मार्च रोजी विविध ठिकाणी नियोजनबद्ध धाडी टाकल्या.
पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे विवेकानंद चौक व देवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहीम राबवली. या कारवाईत अवैध गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात आली. नांदेड रोडवरील बालाजी नगर परिसरात १६ मार्च रोजी सापळा रचून पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले, तर एक आरोपी पसार झाला. अटकेत घेतलेल्या आरोपींमध्ये युनुस इसाक शेख (६०) आणि समीर हाफिज शेख (३३) यांचा समावेश असून त्यांच्या ताब्यातून ₹३९,५०० किमतीचा प्रतिबंधित जर्दा जप्त करण्यात आला.देवणी परिसरात १७ मार्च रोजी सकाळी तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये स्कुटी व मोटारसायकलवरून गुटखा वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. यामध्ये सलीम सत्तार तांबोळी (३६), रईस युनुस मनियार (३१) आणि आखील रहीमसाब कुरेशी (३५) यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांचा गुटखा आणि वाहने असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या चारही कारवायांमध्ये मिळून ₹३.४० लाखांपेक्षा अधिक किमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.या मोहिमेत पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे आणि आनंद हाल्लाळे यांनी सक्रिय सहभाग घेतला.दरम्यान, महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची साठवण, विक्री किंवा वाहतूक करणे हा गंभीर गुन्हा असून अशा बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध लातूर जिल्हा पोलीस पुढील काळातही कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis