
रायगड, 17 मार्च, (हिं.स.)। मुरुड तालुक्यातील तेलवडे येथे निष्काळजी वाहनचालकामुळे भीषण अपघात घडून एका पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेलवडे गावातील चौधरी फर्निचर दुकानासमोरील रस्त्यावर हा अपघात घडला. आरोपी चालकाने त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पो (क्र. MH-02-FG-7163) हा कोणताही क्लिनर खाली न ठेवता निष्काळजीपणे व अविचाराने मागे घेतला.
यावेळी रस्त्यावरून चालत जाणाऱ्या पादचाऱ्याला टेम्पोने पाठीमागून धडक दिली. धडकेनंतर टेम्पोचे मागील चाक संबंधिताच्या डाव्या खांद्यावरून गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४३/२०२६ दाखल करण्यात आला असून मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत कलम १८४ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार दसाडे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)