
जळगाव, 17 मार्च (हिं.स.) : जळगाव शहरातील शासकीय वसतिगृहात १८ वर्षीय विद्यार्थ्याच्या आत्महत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोहित समाधान पवार (वय १८) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथील रहिवासी होता. रोहितच्या या टोकाच्या पावलामुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही
रोहित हा जळगावमधील शासकीय आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता. आज मंगळवारी (१७ मार्च) दुपारी सुमारे ३ वाजता त्याने वसतिगृहातील आपल्या खोलीत गळफास घेतल्याचे समोर आले. सकाळीच त्याचे वडील आणि काका त्याला भेटून गेले होते. त्यावेळी त्याने प्रकृती अस्वस्थ असल्याचे सांगत कॉलेजला न गेल्याची माहिती दिली होती. दरम्यान, दुपारी रूममेट परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर रोहितला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासाअंती त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान, आत्महत्येपूर्वी रोहितने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक सूचक स्टेटस ठेवले होते. त्यात त्याने म्हटले होते की, “इन्स्टाग्राम अकाउंटला समस्या येत असल्याने आजपासून अकाउंट बंद करत आहे. कोणीही मेसेज करू नये, कोणाला काही वाईट मेसेज गेले असतील तर माफ करा.” या स्टेटसमुळे खळबळ उडाली आहे.
----------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर