
रत्नागिरी, 17 मार्च, (हिं. स.) : मध्य प्रदेशात दि. १९ ते २२ मार्च २०२६ दरम्यान होणाऱ्या पाचव्या सीनियर फेडरेशन कप महिला कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील तस्नीम व समरीन बुरोंडकर या दोन खेळाडूंनी महाराष्ट्र संघात स्थान मिळविले आहे.
भरणे (ता. खेड) येथील अनिकेत स्पोर्ट्स क्लबमधील तस्नीम बुरोंडकर आणि समरीन बुरोंडकर यांची महाराष्ट्र महिला कबड्डी संघात निवड झाली आहे.
या स्पर्धेसाठी राज्यभरातून उत्कृष्ट खेळाडूंची निवड प्रक्रिया पार पडली होती. कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तस्नीम व समरीन यांनी निवड समितीचे लक्ष वेधून घेत संघात आपले स्थान निश्चित केले.
दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत जिल्हा व विभागीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपली छाप पाडली आहे. त्यांच्या यशामागे प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, कुटुंबीयांचे पाठबळ आणि अनिकेत स्पोर्ट्स क्लबचे मोलाचे योगदान आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी