
अकोला, 18 मार्च, (हिं.स.)। अकोला शहरातील गजबजलेल्या सराफा बाजारात धिंगाणा घालत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्याला अखेर अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर या आरोपीची त्याच बाजारात परेड काढण्यात आली आहे.. उभ्या वाहनांना लाथा मारणे, सराफा व्यावसायिकाला शिवीगाळ करणे अशा प्रकारांनी बाजारपेठेत दहशत निर्माण करणाऱ्या या आरोपीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला जेरबंद केले.
सराफा बाजार परिसरात एक इसम अचानक आक्रमक होत उभ्या वाहनांवर लाथा मारू लागला तसेच एका सराफा व्यावसायिकाला अश्लील शिवीगाळ करत गोंधळ घातला. या प्रकारामुळे काही काळ बाजारपेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओची अकोला पोलिसांनी गंभीर दखल घेत तपास सुरू केला. तपासाअंती आरोपीची ओळख सलमान उर्फ राजा नासिर खान अशी पटली. सध्या सण-उत्सवाचा काळ सुरू असल्याने अशा प्रकारच्या कृत्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन अकोला पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे