
चंद्रपूर, 18 मार्च (हिं.स.)।
नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणाऱ्या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज सभागृहात केला. चंद्रपूर मधील ब्रम्हपुरी मतदारसंघात तस्करांना पकडणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना एका नेत्यांकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली जाते आणि तस्करांना सोडवण्यासाठी दबाव टाकला जातो, असे धक्कादायक वास्तव वडेट्टीवार यांनी विधानसभेत प्रश्नोत्तर काळात मांडले.
चंद्रपूर येथील सागवान तस्करी बाबत वडेट्टीवार यांनी सभागृहात एका ताज्या घटनेचा दाखला देताना सांगितले की, चार दिवसांपूर्वी माझ्या मतदारसंघात वनविभागाच्या कनिष्ठ अधिकाऱ्याने सागवान लाकडाने भरलेले दोन ट्रॅक्टर पकडले होते. मात्र, एका स्थानिक नेत्याने थेट वनविभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना आई-बहिणीवरून घाणेरड्या शिव्या दिल्या. या दबावाखाली अधिकाऱ्यांना जप्त केलेले ट्रॅक्टर आणि आरोपींना सोडावे लागले. ही साधी चोरी नसून शस्त्रांसह फिरणाऱ्या संघटित टोळ्यांचा हा धंदा आहे असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला.
नक्षलग्रस्त भागात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी त्यांना शस्त्रे पुरवण्यात यावीत. तसेच या तस्करांचे ,संबंधितांचे मोबाईल सीडीआर तपासल्यास राज्यातील मोठ्या सागवान तस्करी रॅकेटचा उलगडा होईल अस वडेट्टीवार म्हणाले.
याची दखल घेत वनमंत्री यांनी
ज्या अधिकाऱ्यांनी दबावाखाली येऊन तस्करांना सोडले, त्यांची चौकशी करून त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल हे स्पष्ट केले.
तसेच या घटनेतील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांचे सीडीआर तपासून या रॅकेटचा शोध घेतला जाईल. जर यामागे एखादी टोळी किंवा गुंडांच्या फौजा असतील, तर त्यांचा बंदोबस्त करून हे रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त केले जाईल, असे उत्तर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव