
बीड, 18 मार्च (हिं.स.) : परिसरात सध्या उन्हाळी कांद्याची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून, शेतकरी शेतात काढणीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र, बाजारात कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कांद्याचे बाजार भाव एकीकडे पडले, तर कांदा काढण्यासाठी लागणाऱ्या मजुरांचे दर मात्र आकाशाला भिडले आहेत. एका जोडीला हजार रुपये मोजावे लागत आहेत.
नाथापुर, जवळा, नाळवंडी, बेलवाडी, बाभुळवाडी, सांडरवन, पिंपळगाव, ईट, घाटसावळी परिसरात सध्या कांदा काढणी सुरू झाली आहे. या भागांत मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झाली होती. हवामान अनुकूल राहिल्याने उत्पादन चांगले झाले आहे. मात्र, सध्या बाजारात कांद्याला प्रतिक्वि टल सुमारे ८०० ते १२०० रुपये दर मिळत आहे.
कांदा काढणीसाठी मजुरांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. सध्या तालुक्यात मजुरांना दररोज सुमारे ४०० ते ५०० रुपये मजुरी द्यावी लागत असल्याचे शेतकरी सांगतात. काही ठिकाणी कामाच्या प्रमाणानुसार पोते भरणे किंवा कांदा गोळा करण्याच्या हिशेबानेही मजुरी दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च आणखी वाढला आहे.कांद्याचे उत्पादन चांगले आले आहे, पण बाजारभाव खूपच कमी आहेत. खत, औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्च वाढला आहे. या दरात कांदा विकल्यास खर्चही निघणे कठीण आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis