
- ’आयसीएसएसआर’कडून मिळणार १६ लाखांचा निधी
छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च (हिं.स.)।
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव तथा राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.प्रशांत अमृतकर यांना ’आयसीएसएसआर’ यांच्या वतीने १६ लाखांचा ’मेजर रिसर्च प्रोजेक्ट’ मंजूर करण्यात आला आहे. अदिवासी महिलांच्या शिक्षण, आरोग्य योजनांच्या लाभार्थ्यांना झालेला फायदा या संदर्भात या प्रकल्पात अभ्यास, संशोधन करण्यात येणार आहे.
’इंडियन कॉन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च’ यांच्यावतीने डिसेंबर २०२५ मध्ये मेजर / मायनर रसिर्च प्रोजेक्टसाठी प्रस्ताव मागविण्यात आले. ’मेजर रिसर्च प्रोजेक्ट’साठी डॉ.प्रशांत अमृतकर यांनी राज्यशास्त्र विभागाच्यावतीने कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव सादर केला. ’आयसीएसएसआर’च्या वतीने प्रकल्प मंजूरीची यादी मंजूर करण्यात आली आहे.
’स्टेट कपॅसिटी, ई गर्व्हनन्स अॅण्ड कम्युनिटी रिस्पॉनसिव्हनेस इन पब्लिक हेल्थ अॅण्ड एज्यूकेशन सर्व्हिस डिलीव्हरी : ए स्टडी ऑफ ट्रायबल वूमन इन फिथ्य शेडयुल्क एरिया ऑफ इंडिया’ हा प्रकल्प मंजूर करण्यात आला. या प्रकल्पाचा कालावधी पाच वर्षांचा असून यामध्ये १६ लाखांचा निधी मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात ८ लाख देण्यात येणार आहेत. डॉ.अमृतकर यांनी यापुर्वी युजीसी, सीपीईपीए, पीएम उषा व विद्यापीठाचा एक असे चार संशोधन प्रस्ताव गेल्या १५ वर्षात पूर्ण केले आहेत. तसेच संत गाडगेबाबा अध्यासन केंद्राचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत.
या प्रकल्पातंर्गत गडचिरोली (विदर्भ), नंदूरबार (खानदेश) व पालघर (कोकण) अशा महाराष्ट्रातील तीन जिल्हयांचा अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच छत्तीसगड व तेलंगणा य राज्यातील लाभार्थी अदिवासी महिलांच्या संदर्भातील अभ्यास करण्यात येणार आहे या जिल्हयातील आदिवासी समाजातील महिलांना आरोग्य व शिक्षण विषयक योजनांचा झालेला लाभ या संदर्भात अभ्यास व संशोधन करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ.प्रशांत अमृतकर यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis