छ. संभाजीनगर - गुढी पाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च (हिं.स.)। हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी यंदाही शहरात पारंपरिक पद्धतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून, गुरुवारी ही शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या वर्षी या शोभ
छ. संभाजीनगर - गुढी पाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन


छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च (हिं.स.)। हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी यंदाही शहरात पारंपरिक पद्धतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून, गुरुवारी ही शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या वर्षी या शोभायात्रेचे २१वे वर्ष असून, विविध हिंदू संघटना, संप्रदाय आणि समाजघटकांचा यात मोठ्या प्रमाणावर सहभाग असणार असल्याची माहिती माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी दिली.

यंदाच्या शोभायात्रेची खास वैशिष्ट्ये म्हणजे पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणारे नागरिक, घोडे, उंट, आकर्षक चित्ररथ, तसेच विविध देखावे. भगवान श्रीरामांच्या जीवनावर आधारित विविध देखावेही सादर करण्यात येणार असून, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारी ही शोभायात्रा शहरवासीयांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

शोभायात्रेची सुरुवात राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिरातून दुपारी ३ वाजता होईल. त्यानंतर ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून खडकेश्वर शिवमंदिर येथे पोहोचेल. समारोपाच्या वेळी श्रीराम नामस्मरणासह धार्मिक प्रवचन आयोजित करण्यात येणार असून, श्री. श्री. १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगरातही गेल्या अनेक वर्षांपासून ही शोभायात्रा काढली जाते. शहरातील विविध हिंदू संघटना, धार्मिक संस्थांचे कार्यकर्ते, महिला मंडळे, युवक-युवती, तसेच विविध समाजघटक पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत या शोभायात्रेला भव्य रूप देतात, असेही खैरे यांनी सांगितले.

गुढीपाडवा आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सध्या खरेदीचा उत्साह पाहायला मिळत आहे. खरेदीला सुरुवात झाली असून पुढील तीन-चार दिवस बाजारपेठांमध्ये असेच चैतन्यमय वातावरण राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हिंदू नववर्षाचा प्रारंभ आणि साडेतीन मुहूर्तापैकी पहिला मुहूर्त असलेला गुढीपाडवा गुरुवारी साजरा होणार आहे. यानिमित्ताने सोने-चांदी, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स तसेच गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीला ग्राहक पसंती देत आहेत. दुसरीकडे ईदनिमित्त सुकामेवा, शिरखुर्मा साहित्य, कपडे आदी वस्तू खरेदीसाठीही नागरिक मोठ्या संख्येने बाजारात येत आहेत. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते व बाजारपेठा गजबजलेल्या दिसून आल्या. मुख्य बाजारपेठांबरोबरच रस्त्यांवरील हातगाड्यांवरही ग्राहकांची गर्दी उसळल्याचे चित्र होते. बाजारात खरेदीची गर्दी दिसून आली.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande