

अकोला, 19 मार्च, (हिं.स.)। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट आल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट दिला होता. राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने थैमान घातले असून काही ठिकाणी गारपीटही होत आहे.
हवामान खात्याने अकोला जिल्ह्यासाठी 18 ते 20 मार्च दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिला होता आणि त्यानुसार आज अकोला जिल्हा मधील अकोट – दर्यापूर रोड परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या भागात काही ठिकाणी गारपीटही झाली आहे.सध्या अकोला जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांची गहू काढणी सुरू होण्याच्या टप्प्यावर आली आहे. मात्र अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अकोट–दर्यापूर रोड परिसरात शेतात उभे असलेले गहू पीक पावसामुळे आडवे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर गव्हा बरोबरच टरबूज, निंबू, संत्रा पिकांना सुद्धा धोका निर्माण झाला आहे.यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील इतर भागातही हवामान ढगाळ असून पुढील काही तासांमध्ये पावसाची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे