रमजान ईदनिमित्त लातूर शहरात वाहतूक नियोजन
लातूर, 19 मार्च, (हिं.स.)। लातूर शहरात दिनांक २१ मार्च २०२६ रोजी रमजान ईद सण साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी ०७.०० ते ११.०० वाजेदरम्यान पोलीस स्टेशन शिवाजीनगर व एमआयडीसी हद्दीतील दयानंद गेट, बार्शी रोड येथील ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने
वाहतूक व्यवस्था


लातूर, 19 मार्च, (हिं.स.)। लातूर शहरात दिनांक २१ मार्च २०२६ रोजी रमजान ईद सण साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी ०७.०० ते ११.०० वाजेदरम्यान पोलीस स्टेशन शिवाजीनगर व एमआयडीसी हद्दीतील दयानंद गेट, बार्शी रोड येथील ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी एकत्र येणार आहेत.

ईदगाह मैदान हे लातूर–बार्शी मुख्य मार्गावर स्थित असल्यामुळे या मार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. सणाच्या पार्श्वभूमीवर येथे मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन, नागरिकांची सुरक्षितता, वाहतुकीची सुरळीतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लातूर पोलीस प्रशासनाकडून विशेष वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांचे देखरेखीखाली सणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच वाहतूक कोंडी टाळता यावी यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत, ईदगाह मैदान परिसरातील मुख्य मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करून ती पर्यायी मार्गाने वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नमाज पठणासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही व वाहतुकीचे व्यवस्थापन प्रभावीपणे करता येणार आहे.

बंद करण्यात आलेले मार्ग.

ईदगाह मैदान, दयानंद गेट परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अप्पे ऑटो शोरूम (बार्शी रोड) तसेच त्यालगतचा स्व. विलासराव देशमुख मार्ग (रेल्वे लाईन समांतर रस्ता) हा संपूर्ण मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावर एस.टी. बसेस, ट्रक, टेम्पो, खासगी वाहने, टॅक्सी, दुचाकी इत्यादी सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल.

पर्यायी मार्गांची व्यवस्था.

वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी व नागरिकांना सुलभ मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी विविध पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

शिवाजी चौकातून पी.व्ही.आर. चौकाकडे जाणारी जड वाहने व एस.टी. बसेस ह्या तहसील कार्यालयासमोरून ओव्हर ब्रिजमार्गे औसा रोड – राजीव गांधी चौक – छत्रपती चौक (टी-पॉईंट) मार्गे जातील.

हलकी वाहने (दुचाकी, तीनचाकी, चारचाकी) छत्रपती शिवाजी महाराज चौक – औसा रोड – आशियाना टी-पॉईंट – खाडगाव रोड – पी.व्ही.आर. चौक किंवा अंबाजोगाई रोड – जटाळ हॉस्पिटल – शामनगर – इंडिया नगर मार्गे पी.व्ही.आर. चौक.

बार्शी रोडवरून शहरात येणारी जड वाहने :

पी.व्ही.आर. चौक – औसा टी-पॉईंट – राजीव गांधी चौक मार्गे वळविण्यात येतील.

इतर वाहने :

पी.व्ही.आर. चौक – खाडगाव टी-पॉईंट – आशियाना मार्गे औसा रोड किंवा एमआयडीसी – एक नंबर चौक – इंडिया नगर रोड – जुना रेणापूर नाका मार्गे शहरात प्रवेश करतील.

सदर वाहतूक नियोजन व निर्बंध दिनांक २१/०३/२०२६ रोजी सकाळी ०५.०० ते दुपारी १३.०० वाजेपर्यंत लागू राहतील. सणाच्या पार्श्वभूमीवर ईदगाह परिसर व शहरातील प्रमुख ठिकाणी पोलीस अधिकारी व अंमलदारांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून, नागरिकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस कर्मचारी सतत कार्यरत राहतील. सीसीटीव्ही निरीक्षण, पेट्रोलिंग, तसेच संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करून सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande