महावितरणच्या  124 कोटींच्या विविध कामांचे पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण
कोल्हापूर, 19 मार्च (हिं.स.)। महावितरणकडून राबवण्यात येणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही एक सौर क्रांती असून यामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न व अडचणी पटकन सुटत आहेत. या योजनेमुळे शासनास शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देणे शक्य होत आहे. शेतीला द
महावितरण कोल्हापूर विकासकामांचे लोकार्पण


कोल्हापूर, 19 मार्च (हिं.स.)।

महावितरणकडून राबवण्यात येणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही एक सौर क्रांती असून यामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न व अडचणी पटकन सुटत आहेत. या योजनेमुळे शासनास शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देणे शक्य होत आहे. शेतीला दिवसा पाणी देणे शक्य होत असल्याने शेतकऱ्यांचे रात्रीचे जागरण, जंगली प्राणी यांपासून सुटका झाली आहे. आता त्यांना कुटुंबासही वेळ देता येणार आहे. म्हणूनच ही एक क्रांतिकारक योजना असून याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

महावितरणने वीज ग्राहकांच्या सेवा अधिक दर्जेदार करण्याच्या दृष्टीने गारगोटी, राधानगरी व आजरा उपविभागात १२४ कोटींची विविध कामे केली आहेत. या कामांचे प्रातिनिधिक स्वरुपात तांबाळे (ता.भुदरगड), कसबा वाळवा व धामोड (ता. राधानगरी) या तीन ठिकाणी लोकार्पण सोहळ्या प्रसंगी प्रकाश आबिटकर बोलत होते.

यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, पूनम रोकडे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे, राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख, पंचायत समिती भुदरगडचे सभापती विक्रमसिंह पाटील, उपसभापती अरुणा देसाई, गोकुळचे संचालक नंदकुमार डेंगे, जिल्हा परिषद सदस्या सारिका नांदेकर, अरुण जाधव, परिसरातील आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, विविध गावांचे सरपंच मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर पुढे म्हणाले, ‘विविध सौर योजनांमुळे महावितरणवरील विजेचा अतिरिक्त ताण कमी होता आहे. पीएम सुर्यघर योजनेमुळे लोकांच्या घराचे वीजबिल शून्य होत आहे. त्यामुळे सौर योजनांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. भुदरगड व राधानगरी तालुक्यातील १२५ गावांतील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. उर्वरित गावांकरिताचे काम प्रगतीपथावर असून लवकरच सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल. महावितरण अधिकारी-कर्मचारी हे अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करत काम करतात. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुकही आपण केले पाहिजे.’ यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलेले काम नागरिकांपर्यंत पोहचवा, त्यांच्या अडचणी अधिक समरसतेने समजून घेऊन सुसंवाद वाढवा, असे आदेश महावितरण कर्मचाऱ्यांना दिले.

*भुदरगड व राधानगरी तालुक्यात १२४ कोटींची कामे*

महावितरणने विविध योजनांतून भुदरगड व राधानगरी तालुक्यात १२४ कोटींची कामे केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने ७७ कोटींचे २२ मेगावॉटचे सौर ऊर्जा प्रकल्प उभा करणे, कसबा वाळवा(१०एमव्हीए) व गवसे-हरपवडे( ५ एमव्हीए) येथे ७ कोटींचे नवीन रोहित्र उभा करणे, १४.२ कोटींचे काम करून विविध आठ ठिकाणांच्या उपकेंद्रांच्या रोहीत्रांची क्षमता वाढ करणे व अतिरिक्त रोहित्र उभा करणे यांचा समावेश होतो. याच बरोबर सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना व विशेष घटक योजनेतून ९.१८ कोटी खर्च करून ३६४ ठिकाणी विद्युत वाहिन्यांचे स्थलांतर करणे, नवीन वीज जोडणी योजनेतून ९.३५ कोटी खर्च करून ७६४ नवीन वीज ग्राहकांना वीज जोडणी देणे, विद्युत अपघात टाळण्याच्या दृष्टीने ३.५१ कोटी खर्च करून स्पेसर्स बसवणे, वितरण पेट्या बसवणे, गंजलेले पोल व तारा बदलणे आदी कामे करण्यात आली आहेत. कृषी आकस्मिक निधी योजनेतून ४.८० कोटी खर्च करून मासेवाडी(ता.आजरा) येथे ५ एमव्हीए क्षमतेचे नवीन उपकेंद्र उभा करण्यात आले आहे.

कार्यक्रमास विविध गावाचे सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande