
रत्नागिरी, 19 मार्च, (हिं. स.) : देवरूख शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त झाला असून, यामध्ये अत्याधुनिक नमो उद्यान, सुसज्ज व्यायामशाळा आणि नदीपात्रात बोटिंग सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.
नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी उपनगराध्यक्ष वैभव पवार आणि मुख्याधिकारी प्रशांत भोसले उपस्थित होते.
देवरूखमधील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ जवळ १ कोटी रुपये खर्चून नमो उद्यान साकारले जाणार आहे. हे उद्यान अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असेल. या प्रकल्पांतर्गत नमो उद्यान स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, यासाठी कोट्यवधी रुपयांची बक्षिसे ठेवली आहेत.
देवरूखच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी शाळा क्रमांक १ जवळील नदीघाटापासून शाळा क्रमांक २ पर्यंत नदीपात्रात बोटिंग सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामुळे पर्यटकांचा ओघ वाढायला मदत होणार आहे.
याशिवाय महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज व्यायामशाळा उभारण्यासाठी ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. रस्ते विकासासाठी आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून ६५ लाख आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्यातून ५५ लाख असा एकूण १ कोटी २० लाखांचा निधी मिळाला आहे. यामुळे शहरातील रस्ते अधिक दर्जेदार होणार आहेत. चिकन वेस्ट प्रक्रिया आणि कंपोस्टिंग प्रकल्पालाही मंजुरी मिळाली असून शहराच्या स्वच्छतेवर भर दिला जाणार आहे.
शासनाच्या नवीन ऑनलाइन पोर्टलद्वारे आता कर आकारणी केली जाणार आहे. थकीत मालमत्ता करावर दरमहा २ टक्के दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली घरपट्टी आणि पाणीपट्टी वेळेत भरून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देवरूखचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी यावेळी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी