
अमरावती, 19 मार्च (हिं.स.) जिल्ह्यातील ६९ ग्रामपंचायतींमधील सरपंच व सदस्यांच्या रिक्त पदांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ११ सरपंच व ९८ सदस्य, अशा १०९ रिक्त पदांसाठी २८ एप्रिल रोजी मतदान तर २९ ला मतमोजणी होणार आहे. याकरिता सात एप्रिलपासून नामांकन स्वीकारल्या जाणार आहे. गत दोन वर्षांच्या बहुप्रतीक्षेनंतर या ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक लावण्यात आली आहे. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत रिक्त असलेल्या पदांसाठी ही निवडणूक घेतली जात आहे. अंतिम मतदारयादी २४ फेब्रुवारीला प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकीची प्रतीक्षा होती. मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच ६९ ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी ११६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून प्रशासनाने आवश्यक यंत्रसामग्रीचीही तयारी केली आहे. निवडणुकीसाठी १५४ कंट्रोल युनीट आणि २२९ बॅलेट युनीट उपलब्ध ठेवण्यात आले आहे. या निवडणुकीत ६५ हजार ९९५ मतदार मतदान करणार असून ३२ हजार ३११ महिला, ३३ हजार ६३८ पुरुष आणि एक इतर मतदार, असा समावेश आहे.
निवडणूक कार्यक्रम नामांकन ः
७ ते १३ एप्रिल छाननी :
१५ एप्रिल माघार :
१७ एप्रिल मतदान :
२८ एप्रिल (सकाळी ७.३० ते सायं. ५.३०)
मतमोजणी व निकाल : २९ एप्रिल
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी