
अमरावती, १९ मार्च (हिं.स.) । अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी बुधवार (१८ मार्च २०२६) रोजी पोद्दार शाळेजवळील बंद पडलेल्या डांबरीकरण रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. काम अनेक दिवसांपासून ठप्प असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. याबाबत पोद्दार शाळेकडून महापौरांना निवेदन देण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर महापौरांनी स्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्याचे काम तात्काळ पुन्हा सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. नागरिकांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन काम विलंब न करता नियोजनबद्ध व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी स्थानिक नागरिकांनी रस्त्यालगत वाढलेल्या झुडपांमुळे वाहतुकीसह पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत असल्याची समस्या मांडली. त्याची तत्काळ दखल घेत महापौरांनी उद्यान विभागाला झुडपे व अनावश्यक वाढलेल्या झाडांच्या फांद्या काढून परिसर स्वच्छ व सुरक्षित करण्याचे आदेश दिले.
महापौर श्रीचंद तेजवाणी म्हणाले, “नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. कामात होणारा विलंब सहन केला जाणार नाही. गुणवत्ता राखून आणि सुरक्षिततेची काळजी घेत काम लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे.”
महापौरांच्या निर्देशानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्याची कार्यवाही हाती घेतली असून परिसरातील अडथळे दूर करण्याचे कामही तात्काळ करण्यात येणार आहे.
या पाहणीदरम्यान उपविभागीय अभियंता विनोद बोरसे, शाखा अभियंता सुनील जाधव, श्रीकांत गिरी, महेश जोशी, संबंधित अधिकारी-कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी