
पुणे, 19 मार्च (हिं.स.) - शिवसेनेची साथ सोडत मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करून परत येत असताना झालेल्या अपघातात माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत हे जखमी झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोलापूर-पुणे महामार्गावर बारामतीजवळ बुधवारी मध्यरात्री हा अपघात झाला. धनंजय सावंत हे आपल्या काही सहकाऱ्यांसोबत फॉर्च्युनर कारमधून जात होते. मध्यरात्री उशिरा बारामतीपासून जवळच असलेल्या भिगवणजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. त्यांच्या कारला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली आहे. यात कारचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने सावंत यात सुखरूप बचावले आहेत.
अधिक माहिती अशी की, धनंजय सावंत हे बुधवारी मुंबईत भाजपमध्ये अधिकृत पक्षप्रवेशाचा सोहळा आटोपून आपल्या फॉर्च्युनर (MH 12 SE 5559) गाडीने परंड्याकडे येत होते. मध्यरात्री एकच्या सुमारास भिगवणजवळील डाळज २ गावाच्या हद्दीत आले असता, समोरून येणाऱ्या कंटेनरने (MH 12 WJ 6374) त्यांच्या वाहनाला भीषण धडक दिली. दरम्यान कारचालक आणि सुरक्षारक्षक किरकोळ जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
या अपघातावर प्रतिक्रिया देताना धनंजय सावंत यांनी सांगितलं की, कार्यकर्त्यांचे प्रेम, शुभेच्छा आणि ईश्वराची कृपा यामुळेच मी आज या भीषण अपघातातून सुखरूप बाहेर आलो आहे. थोड्या किरकोळ जखमा झाल्या असल्या तरी प्रकृती स्थिर आहे, कुणीही काळजी करू नये.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी