
रत्नागिरी, 19 मार्च, (हिं. स.) : राजापूर येथे आज हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली.
सकाळी ९.३० वाजता शोभायात्रेला प्रारंभ झाला. ग्रामदेवता श्री निनादेवी मंदिर येथून सुरू झालेली ही यात्रा श्री देव चव्हाटा मंदिर, शिवस्मारक चौक मार्गे पार पडली. यात्रेत पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले नागरिक, ढोल-ताशांचा गजर, भगवे ध्वज आणि गुढ्या उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या वेशभूषेतील कु. जिज्ञा जयेश हर्डीकर यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून विशेष दाद मिळाली.
या यात्रेचे आयोजन राजापूरच्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीने केले होते. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि शिस्तबद्ध सहभाग यामुळे ही स्वागत यात्रा अत्यंत यशस्वी ठरली असून, नववर्षाच्या स्वागताला एक वेगळाच उत्साह लाभला.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी समितीचे अध्यक्ष राजेंद्र कुशे, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर शिवस्मृती मंडळाचे अध्यक्ष सुबोध पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी