

रत्नागिरी, 19 मार्च, (हिं. स.) : गुढीपाडव्याच्या निमित्ताने रत्नागिरीत आज मोठ्या उत्साहात हिंदू नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात आली.
स्वागतयात्रेचे यंदा बाविसावे वर्ष असून, ग्राममंदिर ते समाजमंदिर या संकल्पनेवर ही यात्रा आधारित होती. रत्नागिरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरी मंदिरात गुढी उभारून यात्रेला सुरुवात झाली. भैरी मंदिरातून एक आणि शहरातील मारुती मंदिरातून दुसरी अशा दोन ठिकाणांवरून स्वागतयात्रा निघाल्या आणि त्यांचा जयस्तंभ येथे संगम झाला. तेथून एकत्रित होऊन ही यात्रा श्री पतितपावन मंदिराकडे गेली.
नरसिंहाकडून हिरण्यकश्यपूचा वध होत असल्याचा देखावा, छत्रपती शिवाजी महाराज अशा वेगवेगळ्या विषयांवरील विविध संस्थांचे चित्ररथ या यात्रेत सहभागी झाले होते. आबालवृद्ध स्त्री-पुरुष पारंपरिक पोषाखामध्ये यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जिल्ह्यात अन्य ठिकाणीही अशा स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी