
बीड, 19 मार्च, (हिं.स.)। अंबाजोगाई येथील मध्यवर्ती बसस्थानकात दोन महिलांनी धुमाकूळ घातल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. या महिलांनी धावत्या बसेस अडवून चालकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि बससमोर लिंबू कापून 'भानामती' सदृश्य अघोरी प्रकार केले. सुमारे एक तास चाललेल्या या प्रकारामुळे बसस्थानकातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
घटनेच्या वेळी तिथे एकही सुरक्षा रक्षक किंवा पोलीस कर्मचारी तैनात नसल्याने या महिलांचे धाडस वाढले होते. या धक्कादायक प्रकारामुळे करणी-बाधेच्या भीतीने अनेक प्रवाशांनी बसमध्ये चढण्यासही धास्ती घेतली होती. या गंभीर घटनेची दखल घेत आगार प्रमुखांनी अंबाजोगाई शहर पोलिसांना लेखी निवेदन देऊन तातडीने बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसस्थानक परिसरात कायमस्वरूपी पोलीस गस्त असणे आवश्यक असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis