
अमरावती, १९ मार्च (हिं.स.) । अमरावती महानगरपालिकेचे आर्थिक वर्ष २०२६-२७ साठीचे ८४३.७४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंगळवारी प्रशासनाने स्थायी समितीकडे सादर केले. या अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न ४३७.२४ कोटी रुपये तर भांडवली उत्पन्न ४०६.५० कोटी रुपये दर्शविण्यात आले आहे.
यंदाच्या अंदाजपत्रकात शहर विकासासाठी विविध योजना प्रस्तावित करण्यात आल्या असून, गतवर्षाच्या तुलनेत ११७.७७ कोटी रुपयांची उत्पन्नवाढ अपेक्षित आहे. महसुली उत्पन्नातही ३६.०१ कोटी रुपयांची वाढ दाखविण्यात आली आहे. महापालिकेच्या एकूण उत्पन्नाच्या तुलनेत खर्चाचे नियोजन करण्यात आले असून, मागील वर्षी १४७.९५ कोटी रुपयांची शिल्लक दर्शविण्यात आली होती.
दरम्यान, यंदाच्या अंदाजपत्रकातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नगरसेवकांच्या वॉर्ड विकास आणि स्वेच्छानिधीत करण्यात आलेली मोठी कपात. प्रशासनाने प्रत्येक नगरसेवकासाठी ५ लाख रुपये वॉर्ड विकास निधी आणि ५ लाख रुपये स्वेच्छानिधी असा एकूण १० लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. यापूर्वी हा निधी २० लाख रुपये होता. शहरातील ९५ नगरसेवकांसाठी एकूण १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
स्थायी समितीचे सभापती अविनाश मार्डीकर यांनी सांगितले की, समितीकडून आवश्यक शिफारसी केल्यानंतर अंदाजपत्रक पुन्हा प्रशासनाकडे सुधारण्यासाठी पाठविले जाईल. त्यानंतर सुधारित अंदाजपत्रक स्थायी समितीकडे अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात येईल.
अंतिम मंजुरीनंतर हे अंदाजपत्रक २७ मार्च रोजी विशेष सर्वसाधारण सभेत सभागृहासमोर मांडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी