
येवला, 21 मार्च, (हिं.स.)। क्रिकेट हा केवळ खेळ नसून तो शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित करणारा प्रभावी माध्यम आहे. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना आपली क्रीडा कौशल्ये सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते. भुजबळ ब्रिगेडने घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून, यामुळे येवल्यातील क्रीडा संस्कृतीला नवे बळ मिळेल असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.
गोशाळा मैदान येवला येथे भुजबळ ब्रिगेड आयोजित येवला प्रीमियर लीग क्रिकेटचा महा-रणसंग्राम निमित्त मैदानाचे पूजन करत कामाचा शुभारंभ माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी मैदान व संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली.
यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, शहराध्यक्ष दत्ता निकम, नगरपरिषदेचे गटनेते दिपक लोणारी, नगरसेवक प्रवीण बनकर, नगरसेवक गोटू मांजरे, गणेश गायकवाड, नितीन गायकवाड, सुनील पैठणकर, मकरंद सोनवणे, दिपक गायकवाड, भाऊसाहेब धनवटे, सचिन सोनवणे, क्रिकेट मॅचचे समन्वयक राजेंद्र पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, दि. २९ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान येवला शहरातील गोशाळा मैदान येथे भुजबळ ब्रिगेड आयोजित येवला प्रीमियर लीग क्रिकेटचा महा-रणसंग्रामचे आयोजन करण्यात आले आहे. भुजबळ करंडकाच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत होते. मात्र काही दिवसांपासून त्यात खंड पडला होता. आता पुन्हा या स्पर्धा आपण घेत आहोत. त्यामाध्यमातून आपण क्रिकेटच्या स्पर्धा राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV