
मियामी, २१ मार्च (हिं.स.) : मियामी ओपन -2026 स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिला गटातील अव्वल टेनिसपटूंनी दमदार सुरुवात करत स्पर्धेला रंगत आणली, मात्र काही अनपेक्षित निकालांनी चाहत्यांना आश्चर्यचकित केले.
पुरुष गटात जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या कार्लोस अल्काराझने आपली उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत ब्राझीलच्या युवा खेळाडू जॉन फॉन्सेका ला ६-४, ६-४ अशा सरळ सेट्समध्ये पराभूत केले.
अल्काराझने दोन्ही सेटमध्ये सुरुवातीपासून आघाडी घेत सामना पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवला. विशेष म्हणजे त्याने सामन्यातील सर्व ब्रेक पॉइंट्स यशस्वीपणे वाचवत आपली बचावात्मक क्षमता दाखवून दिली. त्याचा पुढील सामना अमेरिकेच्या सेबास्टियन कोर्डा सोबत होणार असून हा सामना चुरशीचा ठरण्याची शक्यता आहे.
महिला गटात जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या अरिना सबालेंका हिने अमेरिकेच्या ॲन ली वर ७-६, ६-४ असा विजय मिळवत आपल्या विजेतेपदाच्या बचावाची सुरुवात यशस्वी केली. दुसरीकडे, अमेरिकेची युवा स्टार कोको गॉफ हिने इटलीच्या एलिझाबेथ कोचियारेटो विरुद्ध ३-६, ६-४, ६-३ असा शानदार पुनरागमन विजय नोंदवला.
तसेच, अमांडा अनिसिमोव्हा हिने अजला तोम्ल्यानोविचला ६-१, ५-७, ६-४ ने हरवत पुढील फेरीत प्रवेश केला.
पुरुष गटात सर्वात मोठा उलटफेर अमेरिकेच्या ईथन क्विनने घडवून आणला. त्याने नॉर्वेच्या अव्वल खेळाडू कॅस्पर रुड याला ६-४, ७-६ ने पराभूत करत स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला.
याशिवाय, जपानच्या रे साकामोटोने अमेरिकेच्या अलेक्सांद्र कोवाचेविचवर विजय मिळवत आपल्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा गाठला. साकामोटोचा पुढील सामना रशियाच्या दानिल मेदवेदेव सोबत होणार असून हा सामना स्पर्धेतील अत्यंत रोमांचक ठरण्याची अपेक्षा आहे.
एकूणच, मियामी ओपन २०२६ मध्ये अव्वल खेळाडूंची दमदार सुरुवात आणि काही धक्कादायक निकाल यामुळे स्पर्धा अधिकच रंगतदार बनली आहे. ----------------------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे