फुटबॉल विश्वचषकापूर्वी ख्रिस्तियानो रोनाल्डो दुखापतग्रस्त
नवी दिल्ली, 21 मार्च (हिं.स.)पोर्तुगीज स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा मेक्सिको आणि अमेरिकेविरुद्धच्या विश्वचषकापूर्वीच्या सराव सामन्यांसाठीच्या संघात समावेश करण्यात आलेला नाही. हा ४१ वर्षीय फुटबॉलपटू फेब्रुवारीच्या अखेरीपासून आपल्या अल-नस्
क्रिस्टियानो रोनाल्डो


नवी दिल्ली, 21 मार्च (हिं.स.)पोर्तुगीज स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा मेक्सिको आणि अमेरिकेविरुद्धच्या विश्वचषकापूर्वीच्या सराव सामन्यांसाठीच्या संघात समावेश करण्यात आलेला नाही. हा ४१ वर्षीय फुटबॉलपटू फेब्रुवारीच्या अखेरीपासून आपल्या अल-नस्र या क्लबकडून खेळलेला नाही. पोर्तुगालचे मुख्य प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ यांनी स्पष्ट केले आहे की, त्याची दुखापत गंभीर नाही आणि विश्वचषक संघात त्याचे स्थान निश्चित आहे. फिफा विश्वचषक २०२६ हा ११ जून ते १९ जुलै दरम्यान अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे आयोजित केला जाणार आहे.

प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, रोनाल्डोला हॅमस्ट्रिंगचा त्रास होत आहे. ते म्हणाले, ही एक किरकोळ दुखापत आहे. रोनाल्डो पुढील एक-दोन आठवड्यांत मैदानावर परत येईल. ख्रिस्तियानोने या हंगामात आपल्या तंदुरुस्तीवर केलेली मेहनत उत्कृष्ट आहे. त्याची शारीरिक क्षमता पाहता, सध्या तरी कोणतीही मोठी समस्या दिसत नाही.

विश्वचषक नियोजनाबाबत प्रशिक्षकांनी सांगितले की, या स्पर्धेत ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि गोंझालो रामोस सेंटर-फॉरवर्डची भूमिका बजावतील. मार्टिनेझ यांच्या मते, अंतिम विश्वचषक संघ निवडण्यापूर्वीचे हे शेवटचे प्रशिक्षण शिबिर आहे, त्यामुळे त्यांना काहीतरी नवीन प्रयोग करून पाहायचा आहे. रोनाल्डोच्या अनुपस्थितीत, इतर फुटबॉलपटूंना आजमावून पाहण्याची ही प्रशिक्षकांची शेवटची संधी असेल.

फुटबॉल विश्वचषकामध्ये पोर्तुगालला 'क' गटात स्थान देण्यात आले आहे. या गटात पोर्तुगालसोबत कोलंबिया आणि उझबेकिस्तान यांचाही समावेश आहे. चौथा संघ प्ले-ऑफद्वारे निश्चित केला जाईल, ज्यामध्ये न्यू कॅलेडोनिया, जमैका किंवा डीआर काँगो यांपैकी एक संघ गटात सहभागी होऊ शकतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande