
नवी दिल्ली, 21 मार्च (हिं.स.)गेल्या मोसमात पंजाब किंग्सचा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरने आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले होते. पण विजेतेपदाच्या सामन्यात पंजाबचा रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) कडून पराभव झाला.
या सगळ्यात, गेल्या वर्षभरात श्रेयससाठी वैयक्तिक आयुष्य फारसे चांगले गेले नाही. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. आता श्रेयसने खुलासा केला आहे की, या दुखापतीमुळे त्याचे सात किलो वजन कमी झाले.
आयपीएल २०२६ चा मोसम २८ मार्चपासून सुरू होत असून, श्रेयस पुन्हा एकदा पंजाब किंग्सचे नेतृत्व करणार आहे. श्रेयस म्हणाला, दुखापतीतून सावरणे नेहमीच आव्हानात्मक असते. एका गंभीर दुखापतीमुळे माझे जवळपास सात किलो वजन कमी झाले. सुदैवाने, दोन महिन्यांनंतर मी पुन्हा चांगल्या स्थितीत आलो. पण ते सात किलो वजन परत मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. मला आव्हाने आवडतात आणि हे असेच एक आव्हान होते ज्यावर मला मात करायची होती. मी त्या टप्प्यावर मात केली आणि माझ्या संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी परत आलो आहे याचा मला आनंद आहे, तसेच मी मागील मालिकेत भारताचेही प्रतिनिधित्व केले आहे.
मागील हंगामात उपविजेतेपद पटकावल्यानंतर, श्रेयसला माहित आहे की चाहते यावर्षी संघाकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत आहेत. तो म्हणाला, अपेक्षा खूप जास्त आहेत, आणि हीच एक गंमत आहे. मला आव्हान स्वीकारायला आवडते, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा कधी आम्ही मैदानात उतरतो, तेव्हा आम्हाला जिंकायचेच असते. माझी नजर ट्रॉफीवर आहे. हा तो काळ आहे जेव्हा आम्ही दोन महिने एका कुटुंबाप्रमाणे एकत्र घालवतो.
कर्णधार श्रेयस अय्यरने स्पष्ट केले की टीम हॉटेलमध्ये एकत्र घालवलेला वेळ हा सराव सत्रांइतकाच महत्त्वाचा आहे. श्रेयस म्हणाला, हा तो काळ आहे जेव्हा आम्ही दोन महिने एका कुटुंबाप्रमाणे एकत्र घालवतो. आम्ही जितका जास्त वेळ एकत्र घालवू, तितके आम्ही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखू. आता आमचे नाते अधिक घट्ट करण्याची वेळ आहे. आम्ही आमचा बहुतेक वेळ गेम रूममध्ये खेळ खेळण्यात घालवतो. सामन्याचे नियोजन आणि रणनीती सहसा सामन्याच्या एक-दोन दिवस आधी केली जाते, पण मैदानाबाहेरील हे घट्ट नातेच आम्हाला शेवटी चांगले परिणाम मिळविण्यात मदत करते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे