समृद्धी महामार्गासाठी स्टील पुरवठ्यात घोटाळा; वाहतूक कंपनीविरोधात गुन्हा दाखल
परभणी, 24 मार्च (हिं.स.) : जालना ते नांदेड या समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी स्टील पुरवठ्यात घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी संबंधित वाहतूक कंपनीविरुद्ध नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाच्या
समृद्धी महामार्गासाठी स्टील पुरवठ्यात घोटाळा; वाहतूक कंपनीविरोधात गुन्हा दाखल


परभणी, 24 मार्च (हिं.स.) : जालना ते नांदेड या समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी स्टील पुरवठ्यात घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी संबंधित वाहतूक कंपनीविरुद्ध नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गाच्या जालना-नांदेड टप्प्याच्या बांधकामासाठी पीएनसी इन्फ्राटेक लि. या कंपनीने स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लि., नागपूर येथून स्टील खरेदी केले होते. या स्टीलची वाहतूक जयपूर येथील सुनीता रोड कॅरियर्स प्रा. लि. या कंपनीमार्फत केली जात होती. नागपूरहून परभणी येथील प्लांटवर ट्रेलरद्वारे स्टीलचा पुरवठा सुरू होता.मात्र, आलेल्या तीन ट्रेलरपैकी दोन ट्रेलरमध्ये स्टीलचे वजन कमी असल्याचे तपासणीदरम्यान आढळून आले. वाहन क्रमांक GJ 05 BZ 0871 या ट्रेलरमध्ये 11.34 टन, तर MH 40 CM 7007 या ट्रेलरमध्ये 8.84 टन स्टील कमी असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चालकांकडे चौकशी केली असता, चालक व संबंधित कर्मचारी घटनास्थळावरून पळून गेले. तिसऱ्या ट्रेलरचाही चालक वाहन सोडून फरार झाल्याने संशय अधिक बळावला.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीएनसी इन्फ्राटेक लि. कंपनीचे सहाय्यक प्रशासकीय प्रबंधक उदित राकेश जैन यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.--------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande