
नांदेड, 24 मार्च (हिं.स.)।नांदेड येथील श्रीराम जन्मोत्सव समितीच्यावतीने हिंदू एकता दिवस व श्री राम जन्मोत्सवाच्या निमित्ताने यंदाही भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (ता.२६) दुपारी १२ वाजता श्रीराम मंदिर, रामघाट येथे महाआरती करण्यात येणार आहे. त्यानंतर गाडीपुरा येथील रेणुका माता मंदिरातून दुपारी दीडला मिरवणुकीला सुरवात होणार आहे
मागील १७ वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. यावर्षीच्या मिरवणुकीत राम-रावण युद्ध झाँकी, भगवान नृसिंह अवतार, देशभक्तिपर ऑपरेशन सिंदूर झाकी, भोलेनाथ व साधू-महात्म्यांचे देखावे, अयोध्येतील रामलल्ला मूर्ती तसेच गौमाता प्रतिमा हे प्रमुख आकर्षण असणार आहे. विशेष म्हणजे महिलांसाठी स्वतंत्र शौर्य पथकाची स्थापना करण्यात आली असून, 'धर्मरक्षक' या नावाने ओळखल्या
जाणाऱ्या सात हजार स्वयंसेवकांचा सहभाग असणार आहे. मिरवणुकीची सुरवात श्री रेणुका माता मंदिर येथील देवीची आरती करून व प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे संताच्या हस्ते अनावरण व आरती करून मिरवणुकीचा प्रारंभ होणार आहे.ही मिरवणूक जुना मोंढा टॉवर, संत बाबा निधानसिंह गुरुद्वारा चौक, महावीर चौक, हनुमान पेठ वजिराबाद, कलामंदिर, शिवाजीनगर, महात्मा फुले पुतळा (आयटीआय), श्रीनगर मार्ग, वर्कशॉप मार्गे अशोकनगर येथील श्री राम मंदिरात पोचणार आहे. तेथे आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.
------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis