
नांदेड, 24 मार्च (हिं.स.)। माहूर गडावर चैत्र नवरात्रोत्सवाचा उत्साह आनंदात साजरा होत आहे. सोमवारी ललित पंचमीचे औचित्य साधून श्री रेणुकामाता मंदिरात विविध फळांची आकर्षक आरास करण्यात आली होती. द्राक्षे, मोसंबी, संत्री आणि इतर हंगामी फळांनी सजलेला देवीचा गाभारा भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.
या मंगलदिनी पहाटेपासूनच धार्मिक विधींना सुरुवात झाली. मंदिर संस्थानच्या वतीने देवीची अलंकार महापूजा करण्यात आली. फळांच्या या नयनरम्य सजावटीमुळे आदिशक्तीचे रूपअधिकच तेजस्वी दिसत होते. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर शेजारील तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातूनही हजारो भाविकांनी दर्शनासाठी गडावर गर्दी केली होती. माहूरचा गड सध्या भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला असून, 'आई राजा उदो-उदो'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.
चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर संस्थानने विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ललिता पंचमीला विशेष महत्त्व असल्याने मंदिरात मंत्रोपचार, महाआरती आणि विशेष होमहवन पार पडले. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून दर्शन व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि सुरक्षिततेचे चोख नियोजन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis