रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत अर्थ व बांधकाम सभापती पदावर महायुतीत रस्सीखेच
रायगड, २४ मार्च (हिं.स.) : रायगड जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदांच्या निवडणुकीत आरक्षित पदांवर महायुतीत समन्वयाचे चित्र दिसत असले, तरी अर्थ व बांधकाम सभापती पदावर खरी ‘सत्तेची खेळी’ समोर आली आहे. या महत्त्वाच्या खात्यावर भाजप आणि शिवसेना या दोन
Twist in Speaker election; Controversy flares up over important portfolio


रायगड, २४ मार्च (हिं.स.) : रायगड जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदांच्या निवडणुकीत आरक्षित पदांवर महायुतीत समन्वयाचे चित्र दिसत असले, तरी अर्थ व बांधकाम सभापती पदावर खरी ‘सत्तेची खेळी’ समोर आली आहे. या महत्त्वाच्या खात्यावर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी दावा ठोकल्याने महायुतीत अंतर्गत रस्सीखेच उफाळून आला असून अंतिम निर्णय आता पक्षश्रेष्ठींच्या पातळीवर गेला आहे.

अलिबाग येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. अनिकेत तटकरे यांनी सांगितले की, अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतले जाणार आहेत. त्यामुळे महायुतीतील सत्तावाटपाचे अंतिम समीकरण काय ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरक्षित पदांबाबतचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. शिवसेनेच्या रसिका केणी यांनी महिला व बालविकास सभापती पदासाठी, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नारायण डामसे समाजकल्याण सभापती पदासाठी अर्ज सादर केला आहे. या पदांवर वाद न दिसता निर्णय अपेक्षित आहे.

मात्र, खरी चुरस अर्थ व बांधकाम सभापती पदावर पाहायला मिळत आहे. भाजपचे वैकुंठ पाटील आणि शिवसेनेचे उत्तम कळंबे या दोघांनीही या पदासाठी अर्ज दाखल केला असून महायुतीतील अंतर्गत स्पर्धा उघड झाली आहे. जिल्हा परिषदेचा आर्थिक कणा मानल्या जाणाऱ्या या खात्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार लॉबिंग सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

माहितीनुसार, हे महत्त्वाचे खाते भाजपकडे गेल्यास शिवसेनेला शिक्षण व आरोग्यसारखी पर्यायी महत्त्वाची खाती देण्याचा पर्याय विचाराधीन आहे. मात्र या समीकरणात बदल झाल्यास संपूर्ण सत्तावाटपाचे चित्रही बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande