
जळगाव, 25 मार्च (हिं.स.) कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच ओळख लपविणारे गुन्हेगार जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या ऑल आऊट ऑपरेशन व नाकाबंदीत ३६ गुन्हेगार रडारवर आले. ११३ हिस्ट्रीशिटर चेक केले. त्यांची पोलिसांनी धरपकड केली. वाहन चेकींगमध्ये विना परवाना वाहन चालविणाऱ्या १५४ जणांवर दंडात्मक कारवाई केली. सुमारे चार लाख दोन हजार १५० रुपये दंड वसुल केला. संपूर्ण जिल्ह्यात हे ऑपरेशन राबविण्यात आले. या ऑल आऊट ऑपरेशन व नाकाबंदीत जिल्ह्यातील ३६ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकुण ४२ नाकाबंद पॉईट्स लावुन कडक तपासणी करण्यात आली. यामध्ये ५२ अधिकारी तसेच २९६ पोलीस अमंलदार सहभागी झाले होते. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या ऑपरेशन दरम्यान ड्रंक ॲन्ड ड्राईव्हच्या २१ केस केल्या. तर मोटार सायकल कायदा अंतर्गत २९७ केसेस केल्या. बी डब्ल्यू अंतर्गत १७२ तर बीएनडब्ल्यू अंतर्गत १०३ जणांना वॉरंट बजावण्यात आले. अभिलेखावरील १०२ आरोपींची तपासणी करण्यात आली. या कारवाईत एकुण ३२ हद्दपार इसमांची तपासणी केली. त्यापैकी चार हद्दपार गुन्हेगार मिळुन आले. त्यांच्यावर बीपी अॅक्ट प्रमाणे केसेस करण्यात आल्या.अवैध व्यवसाय व प्रतिबंधात्मक कारवाईत दारुबंदी सदराखाली १०३ केसेस तसेच जुगार सदराखाली ४१ केसेस करण्यात आल्या. आर्म ॲक्टखाली सात अमली पदार्थ प्रकरणी एनडीपीएस २७ नुसार २० जणांवर तर संशयास्पद वावरणाऱ्या सहा जणावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ नुसार सहा केसेस करण्यात आल्या. जिल्ह्यात ७५ हॉटेल्स तसेच ६० लॉजेसची चेकिंग करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दिली. यापुढेही जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे अशा प्रकारची ऑल आऊट ऑपरेशन सातत्याने राबविली जातील, असे त्यांनी यावेळी नमुद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर