
नाशिक, 25 मार्च (हिं.स.)।
: स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याला रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरु असून विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे. याचदरम्यान आता अशोक खरातविरोधात पुन्हा नवा गुन्हा दाखल झाला आहे. शिर्डीत अशोक खरातविरोधात पीडित तरुणीने एफआयआर दाखल केली आहे.
अशोक खरातवर शिर्डीत आणखी एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशोक खरातविरोधात काल पीडित तरुणीने एफआयआर दाखल केली आहे. अशोक खरातने ४ वेळा बलात्कार केल्याची पीडित मुलीची तक्रार आहे. अशोक खरातने गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने पोलिसांकडे केली आहे. वाच्यता केल्यास दैवी शक्तीने आई-वडिलांना मारून टाकीन अशी धमकीही दिली. जुलै ते डिसेंबर २०२४ दरम्यान अशोक खरातने चार वेळा बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने दाखल केली आहे. शेतात घर बांधण्यासाठी योग्य जागा सांगा, म्हणत पीडित तरुणीचे कुटुंब अशोक खरातकडे गेले होते. तिसऱ्या भेटीत मुलीने कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा, अशी विचारणा कुटुंबीयांकडून करण्यात आली. यावेळी पीडितेसोबत अशोक खरातने अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, खरातचे इगतपुरी कनेक्शन समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली असून या अनुषंगाने आता पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसआयटीने इगतपुरी तालुक्यात धाड टाकून कसून चौकशी सुरू केली. अशोक खरात हा इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथील एका भोंदूबाबाच्या घरी नियमित येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता या माहितीच्या आधारे एसआयटीचे पथक हे गावी सर्वांगीण चौकशी करू शकते. तेथील एका भोंदूबाबाकडून अशोक खरातला गंडेदोरे, अंगठ्या वगैरे पुरवल्या जात असाव्यात, असा अंदाज वर्तवला जात आहे आणि त्याच वस्तूंचा गैरवापर करून खरात हा अनेक लोकांना, महिलांनाही जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करायचा, त्यांच्यावर अत्याचार करायचा असे दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील स्वारगेट परिसरात या चार्डटअकाउंटंटचे कार्यालय आहे. संबंधित सीए गेल्या पाच वर्षांपासून अशोक खरातसोबत अत्यंत जवळून काम करत होता. खरातने स्थापन केलेल्या 'ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट' वरही या सीएने पाच वर्षे विश्वस्त म्हणून काम पाहिले आहे. सध्या तो या ट्रस्टवर नसला, तरी खरातच्या साम्राज्यातील प्रत्येक पैशाचा हिशोब या सीएच्या माध्यमातूनच पूर्ण व्हायचा. अशोक खरातने केवळ आध्यात्मिक क्षेत्रातच नव्हे, तर रिअल इस्टेटमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे. गेल्या पाच वर्षांत खरातने कुठे-कुठे जमिनींचे व्यवहार केले? त्या व्यवहारांसाठी पैसा कोणाकडून आला? आणि गुंतवणुकीच्या नावाखाली किती लोकांची आर्थिक फसवणूक केली ? या सर्व प्रश्नांची उत्तरे या पुणेकर सीएकडे असण्याची दाट शक्यता आहे. खरातच्या नावावर असलेल्या आणि बेनामी मालमत्तेची सर्व माहिती या सीएकडे दडलेली असल्याचे बोलले जात आहे. नाशिक पोलीस आता या चार्टर्ड अकाउंटंटची चौकशी करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरातच्या अश्लील व्हिडिओंच्या आधारे जे आर्थिक ब्लॅकमेलिंग झाल्याचे आरोप होत आहेत, त्या पैशांचा विनियोग कसा झाला, याचा छडा लावण्यासाठी या सीएची उलट तपासणी होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV