जळगावमध्ये खत विक्रीत अनियमितता; कृषी विभागाकडून कठोर कारवाई
जळगाव, 25 मार्च (हिं.स.) : जिल्ह्यातील खत विक्रीत घडलेल्या अनियमिततेवरून आणि शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या तक्रारींवरून कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन खत विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून, कासोदा (ता. एरंडोल
जळगावमध्ये खत विक्रीत अनियमितता; कृषी विभागाकडून कठोर कारवाई


जळगाव, 25 मार्च (हिं.स.) : जिल्ह्यातील खत विक्रीत घडलेल्या अनियमिततेवरून आणि शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या तक्रारींवरून कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन खत विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून, कासोदा (ता. एरंडोल) येथील एका सहकारी संस्थेसह अन्य दहा व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

कृषी विभागाच्या पथकाने अचानक तपासणी मोहीम राबवली असता अनेक गंभीर त्रुटी उघडकीस आल्या. काही ठिकाणी खताचा साठा अधिकृत नोंदीत दाखवलेला नव्हता, तर काही विक्रेत्यांनी दरपत्रकही लावले नव्हते. याशिवाय, शेतकऱ्यांना खत उपलब्ध नसल्याचे सांगून त्यांच्याकडून जास्त दराने पैसे घेणे सुरू होते, अशी माहितीही मिळाली.

युरिया टंचाईच्या तक्रारीनंतर विशेषत: कासोदा परिसरात मोठी धाड टाकण्यात आली. या कारवाईत सहा दुकानांमधून ३,४१८ गोण्यांचा युरिया साठा जप्त करण्यात आला. शेतकऱ्यांना “युरिया उपलब्ध नाही” असे सांगून प्रत्यक्षात साठा लपवून जास्त दराने विक्री केली जात असल्याचे उघड झाले.

कृषी विभागाने सर्व विक्रेत्यांना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. रब्बी हंगाम संपत आला असला तरी, खत विक्रीत कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही, असा इशारा विभागाने दिला आहे. शेतकऱ्यांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, खत खरेदी करताना आधार कार्ड सोबत ठेवणे आणि आधार लिंक करून खरेदी करणे, तसेच कोणते खत किती प्रमाणात घेतले याची खात्री करून घेणे, गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी स्पष्ट केले की नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही विक्रेत्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल. तसेच शेतकऱ्यांनी कुठेही गैरव्यवहार आढळल्यास तात्काळ कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande