
जळगाव , 25 मार्च (हिं.स.) भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित गुटखा तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आणला आहे. पठाणकोट एक्स्प्रेसमधून तब्बल २ लाख ५३ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी बऱ्हाणपूर येथील एका संशयिताला अटक करण्यात आली. सुनील शिवनारायण मालाकार (वय ४२, शिवाजीनगर, लालबाग, बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) असं त्याचं नाव असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेअप ११०५८ पठाणकोट एक्स्प्रेसमधून मोठ्या प्रमाणावर गुटखा भुसावळहून मनमाड-मुंबईदरम्यान तस्करीसाठी नेला जात असल्याची गोपनीय माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळाली होती. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांना सतर्क करून संयुक्त पथक तयार करण्यात आले. गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर आल्यानंतर इंजिनाजवळील सर्वसाधारण डब्याची झडती घेण्यात आली. यावेळी १७ संशयास्पद बॅगा आढळून आल्याने त्यांची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा आढळला. डब्यातील प्रवाशांकडून चौकशी केल्यानंतर संबंधित बॅगा सुनील शिवनारायण मालाकार याच्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. जप्त केलेल्या १७ बॅगांमध्ये विविध प्रकारचा एकूण २ लाख ५३ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. हवालदार महेश धनराज पराते यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाच्या तपासातून गुटखा तस्करीच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर