उत्तरार्ध एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी २ एप्रिल रोजी गडकरी मध्ये
ठाणे, 25 मार्च (हिं.स.)। सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखा यांच्या सहकार्याने मोरया इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट आयोजित उत्तरार्ध एकांकिका स्पर्धेची रंगतदार प्राथमिक फेरी ठाण्यात उत्साहात पार पडली. अंतिम फेरी २ एप्रिल २०२६
Gadkari Rangayatan


ठाणे, 25 मार्च (हिं.स.)। सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखा यांच्या सहकार्याने मोरया इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट आयोजित उत्तरार्ध एकांकिका स्पर्धेची रंगतदार प्राथमिक फेरी ठाण्यात उत्साहात पार पडली. अंतिम फेरी २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून गडकरी रंगायतन, ठाणे येथे पार पडणार आहे.

२२ मार्च रोजी गडकरी रंगायतन, तालीम हॉल मध्ये उत्तरार्ध एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांचे वय हे ५० किंवा त्यापेक्षा जास्त असावं, या विशेष नियमामुळे ही स्पर्धा इतर स्पर्धांपेक्षा वेगळी ठरत आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून ठाणे, नवी मुंबई, मुंबई, चिपळूण, अलिबाग, नाशिक, सोलापूर, सातारा, कल्याण, पुणे इथल्या एकूण १५ संघांनी स्पर्धेला भरघोस प्रतिसाद दिला.

सॉफ्ट कॉर्नरचे एमडी आणि सीईओ दिलीप कुलकर्णी, त्यांच्या पत्नी आणि मुलासह स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेचे पदाधिकारी आणि अनोख्या स्पर्धेचे कल्पनासूचक रवी मिश्रा देखील प्राथमिक फेरीतील एकांकिकांचा अनुभव घेण्यासाठी उपस्थित होते. प्राथमिक फेरीसाठी एकांकिका, नाटक, सिनेमा, मालिका या क्षेत्रात लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयाचा अनुभव असलेले विशाल कदम आणि विनोद जाधव हे परीक्षक होते.

वयाची पन्नाशी उलटल्यानंतर राहून गेलेल्या किंवा जबाबदाऱ्यांमुळे मागे ठेवलेल्या इच्छा आणि कलागुणांना पुन्हा एकदा नव्याने वाव देता यावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांच्या जोश आणि उत्साहात आपण कुठे मागे पडतोय असेही होऊ नये म्हणून खास या वयोगटासाठी ही स्पर्धा आणि त्याला नवीन संहिता, उत्तम अभिनय याद्वारे मिळालेला प्रतिसाद याचे दोन्ही परीक्षकांनी तोंडभरून कौतुक केले आणि सहभागी संघांना प्रोत्साहन दिले.

तरुण वयात अनुभवलेला किंवा काही कारणास्तव राहून गेलेला रंगमंचावर प्रयोग सादर करण्याचा जोश अनेक वर्षांनी पुन्हा अनुभवता आला, अशा प्रतिक्रिया अनेक स्पर्धकांनी दिल्या. त्याचबरोबर स्पर्धेच्या आयोजनाचे आणि नियोजनाचे सुद्धा कौतुक केलं.

स्पर्धेला आलेल्या प्रतिसादाचं कौतुक करत ही स्पर्धा अजून संपूर्ण महाराष्ट्रभर पसरावी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघांनी स्पर्धेत सहभागी व्हावं, अशी इच्छा स्पर्धेचे आयोजक मोरया इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटचे प्रमुख प्रफुल्ल गायकवाड, कल्पिता पावसकर आणि शिशिर कोण्णुर यांनी व्यक्त केली.

प्राथमिक फेरीतून प्राण, मुंबई - ‘साठी’, कला संस्कृती, ठाणे - ‘आर्टिकल २१’, रंगा थिएटर्स, ठाणे - ‘तरुणाई’, मित्र सहयोग, ठाणे - ‘अनोळखी’, ठाणे आर्टगिल्ड - ‘ती येते आणिक जाते’ या पाच एकांकिका अंतिम फेरीत दाखल झाल्या आहेत. दमदार नाट्यप्रयोग पाहण्यासाठी प्रेक्षकांनी आवर्जून उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी शिशिर - ९९२०१३७८०५, प्रफुल्ल - ९००४९१२४६८, कल्पिता - ९१६७२४६८३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande