२९ मार्चला डॉ.भाग्यश्री पांचाळे आणि भीमराव पांचाळे यांची गझलची ‘स्नेहमैफिल’
ठाणे, 25 मार्च, (हिं.स.)। आपल्या गायकीने मराठी गढल सातासमुद्रापार पोहोचविणारे गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यानिमित्त ‘स्नेहगझल’ या भव्य सोहळ्याचे आयोजन २९ मार्च २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता राम गणेश गडकरी रंगायतन येथे करण्
'Ghazal Nawaz' Bhimrao Panchale


ठाणे, 25 मार्च, (हिं.स.)। आपल्या गायकीने मराठी गढल सातासमुद्रापार पोहोचविणारे गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यानिमित्त ‘स्नेहगझल’ या भव्य सोहळ्याचे आयोजन २९ मार्च २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता राम गणेश गडकरी रंगायतन येथे करण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते भीमराव पांचाळे यांचा सत्कार करण्यात येणार असून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि प्रख्यात गायक पद्मश्री सुरेश वाडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान या सोहळ्याच्या निमित्ताने गझलनवाज भीमराव पांचाळे आणि डॅा. भाग्यश्री पांचाळे यांची मराठी आणि उर्दू गझलांची भावरम्य स्नेहमैफिल होणार आहे.

मराठी गझलला केवळ महाराष्ट्रातच नाही तर सातासमुद्रापार पोहोचविणारे, मराठी गजलला आपल्या कतृत्वाने नावलौकिक मिळवून देणारे गझलनवाज पं. भीमराव पांचाळे ३० मार्च, २०२६ रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत.

गझल सम्राट सुरेश भटसाहेबांनंतर मराठी गझलला सुवर्णकाळ प्राप्त करून देण्याचे प्रामाणिक काम त्यांनी केले आहे. मराठी गझलला सातासमुद्रापार नेले. तिला लोकप्रियता मिळवून दिली. गझल कार्यशाळा, गझल मुशायरे, गझल मैफिली आयोजित करून मराठी गझल लोकप्रिय करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

मराठी गझलला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गझल सागर प्रतिष्ठानची स्थापना केली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये अखिल भारतीय मराठी गझल संमेलने आयोजित केली. या प्रवासात त्यांना अनेक साथीदार मिळाले. त्यांच्या साथीने हा गझलप्रवास अधिक व्यापक आणि समृद्ध होत गेला. त्या सर्व जुन्या-नव्या साथीदारांच्या साक्षीने हा साहळा नटणार आहे.

गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी मराठी गजलसाठी केलेल्या अतुलनीय कामगिरीची दखल राज्य आणि केंद्र शासन तसेच अनेक संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे. अलीकडेच महाराष्ट्र शासनाने भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या सोहळ्याचे निमित्त साधून गझलनवाज भीमराव पांचाळे आणि डॅा. भाग्यश्री पांचाळे यांची मराठी आणि उर्दू गझलांची भावरम्य मैफिल आयोजित करण्यात आली असून ही मैफिल सर्वांसाठी विनाशुल्क आहे. या मैफिलीच्या सन्मानिका राम गणेश गडकरी रंगायतन येथे उपलब्ध असणार आहेत. तरी गझल रसिकांनी या मैफिलीचा लाभ घ्यावा असे आवाहन गझलनवाज भीमराव पांचाळे सत्कार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande