
सोलापूर, 27 मार्च (हिं.स.)। सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या तोगराळी (ता. दक्षिण सोलापूर) शाळेतील उपशिक्षक मधुकर माळी यांनी ‘गुढीपाडवा पट वाढवा’ अभियानाचे गीत तयार केले आहे. ते गाणे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज्यासाठी लागू केले आहे. आता ते गाणे राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये वाजणार आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत दोन गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, पोषण आहार दिला जातो. विविध खेळ व क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. स्मार्ट टीव्हीद्वारे ऑनलाइन शिक्षण दिले जाते. मुलींना उपस्थिती भत्ता दिला जातो. या बाबींचा समावेश त्या गाण्यात आहे. इंग्रजी शाळांशी स्पर्धा करणाऱ्या मराठी शाळा, विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत आणि सामान्य कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने त्यांनी हे गीत तयार केले.
प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांना ते गाणे पाठविण्यात आले. त्यांनी ते राज्याच्या संचालक व उपसंचालकांना पाठविले. त्यात राष्ट्रपती, राज्यपाल, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री तसेच विविध उपक्रमशील शाळांतील विद्यार्थ्यांसमवेतचे फोटो समाविष्ट केले होते. ते गीत शिक्षणमंत्र्यांनी ऐकले आणि राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘पट वाढवा’ अभियानावेळी ते गाणे गावागावांतील विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना ऐकवण्याचे निर्देश दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड