फेसबुक ओळखीतून ‘भोंदू बाबा’चा विवाहितेवर अत्याचार, आरोपी अटकेत
पुणे, 28 मार्च (हिं.स.) : नाशिकमधील भोंदू बाबाच्या प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक घटना समोर आली असून, पुण्यातील मांजरी परिसरात एका भोंदू बाबाने विवाहित महिलेची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केल
फेसबुक ओळखीतून ‘भोंदू बाबा’चा विवाहितेवर अत्याचार, आरोपी अटकेत


पुणे, 28 मार्च (हिं.स.) : नाशिकमधील भोंदू बाबाच्या प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक घटना समोर आली असून, पुण्यातील मांजरी परिसरात एका भोंदू बाबाने विवाहित महिलेची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश वैद्य (रा. वसई) असे आरोपीचे नाव असून, त्याची पीडित महिलेशी सुमारे दोन वर्षांपूर्वी फेसबुकवर ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने स्वतःला महादेवाचा भक्त असल्याचे सांगत महिलेचा विश्वास संपादन केला. “मी महादेव आणि तू पार्वती” असे सांगून त्याने तिच्याशी जवळीक वाढवली.

यानंतर आरोपीने पीडित महिलेला मांजरी परिसरातील एका लॉजवर नेले. तेथे तिला गुंगी येणारे पेय देऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच, तिची अश्लील छायाचित्रे काढून ब्लॅकमेल करत पुन्हा वसई येथील हॉटेलमध्ये बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, नाशिक येथील भोंदू बाबा प्रकरणानंतर धैर्य एकवटत पीडित महिलेने वसईतील माणिकपूर पोलिस ठाण्यात झिरो क्रमांकाने तक्रार दाखल केली. त्यानंतर हा गुन्हा मांजरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

पोलिसांनी पिंपरी परिसरातून आरोपी ऋषिकेश वैद्य याला ताब्यात घेत अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande