पातोंडा येथे घरफोडी; सुमारे २.९२ लाखांचा ऐवज लंपास
जळगाव, 28 मार्च (हिं.स.) : चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथे बंद घराचा कडीकोंडा व कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे २ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. रवींद्र वाल्मिक महाजन (वय ४२, रा. मुंदखेडा रोड, महादेव चौ
पातोंडा येथे घरफोडी; सुमारे २.९२ लाखांचा ऐवज लंपास


जळगाव, 28 मार्च (हिं.स.) : चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथे बंद घराचा कडीकोंडा व कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे २ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

रवींद्र वाल्मिक महाजन (वय ४२, रा. मुंदखेडा रोड, महादेव चौक, पातोंडा) हे कुटुंबासह वास्तव्यास असून ते बांधकाम कंत्राटदार म्हणून कार्यरत आहेत. ते रात्री साडेअकराच्या सुमारास बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घरावर डोळा ठेवला.

चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर संपूर्ण घरात मौल्यवान वस्तूंच्या शोधात सामान अस्तव्यस्त फेकण्यात आले. कपाट उघडून सोने-चांदीचे दागिने तसेच रोकड असा एकूण २,९२,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून आरोपी पसार झाले.

पहाटे घरी परतल्यानंतर महाजन यांना दरवाजाचे तुटलेले कुलूप दिसले. घरात प्रवेश केल्यावर सर्वत्र सामान अस्तव्यस्त पडलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कपाटातील दागिने व रोकड गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवून तक्रार दाखल केली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande