
रायगड, 29 मार्च, (हिं.स.)। माणगाव तालुक्यातील साई मोहल्ला-2 येथील उर्दू शाळेच्या अंगणवाडीत शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या अंगणवाडी सेविकेला मारहाण करून धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित महिला फिर्यादी या अंगणवाडी सेविका असून त्यांची सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, माणगाव यांच्या आदेशानुसार विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेसाठी 18 मार्च 2026 रोजी साई नगर मोहल्ला-2 येथे नियुक्ती करण्यात आली होती.
घटनेच्या वेळी फिर्यादी उर्दू शाळेच्या अंगणात आपले शासकीय काम पार पाडत असताना आरोपी तेथे आला. “मागचे नंबर पुढे व पुढचे नंबर मागे घेतेस” असे म्हणत आरोपीने फिर्यादीला कानाखाली मारून शासकीय कामात अडथळा आणला. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 95/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 132, 121(1), 352, 351(2) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.
या घटनेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)